शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन : आरोग्यांविषयी दक्षता घेण्याच्या सूचना : मळेकरणी देवी यात्राकाळात बंदोबस्ताची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आणणे, मळेकरणी देवी यात्रेमुळे रस्त्यालगतच्या नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, बसुर्तेनजीक लावलेल्या रोपट्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, हेस्कॉमने थ्री-फेज वीज पुरवठा रात्री न देता दिवसा द्यावा, मळेकरणी देवी परिसरातील मंगल कार्यालयाच्या परवानगीची चौकशी करावी, आरोग्य खात्याच्या सभोवतालची स्वच्छता राखावी अशा महत्त्वाच्या ठरावांनिशी सोमवारी आंबेडकर भवन येथे झालेली ग्रामसभा गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे होत्या. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व विविध खात्याचे सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सेक्रेटरी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य यादो कांबळे यांनी केले. ग्रामसभेचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संभाजी कदम व मान्यवरांनी केले. ग्रामसभेचा उद्देश व स्वागत पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी केले.
ग्रामसभेत झालेली महत्त्वपूर्ण ठराव
आरोग्य खात्यातर्फे माहिती देताना आयुष्यमान भारत आरोग्य योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तिला समस्या निर्माण झाली तर बीपीएल कार्डधारकांना पाच लाखापर्यंतचा खर्च तर एपीएल कार्डधारकांना 50 टक्के खर्च मिळतो. आरोग्य खात्याच्या सभोवतालची स्वच्छता करावी अशी सूचना ग्रामस्थांनी केली. रात्रीच्यावेळी एखादी घटना घडली तर आरोग्य केंद्र बंद असते ते चालू ठेवावे, अॅम्बुलन्सची सोय करावी. मळेकरर्णी देवीच्या आमराईत स्वच्छता राखावी, सध्या उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात टीबीचे जवळपास 30 रुग्ण, कुष्ठरोगाचे पंधरा रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, कावीळ असेही रुग्ण आढळत आहेत. याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. मळेकरणीदेवी यात्रा काळात पोलीस बंदोबस्त ठेवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
लसीकरणावेळी सहकार्य करा
पशुसंगोपन खात्यातर्फे लसीकरण करताना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कुक्कुटपालनसाठी 25 लाख, शेळी पालनासाठी चाळीस लाखापर्यंत शासनाकडून मदत केली जाते. याचा फायदा संबंधितांनी घ्यावा असे पशुसंगोपन खात्यातर्फे सांगितले. कृषी खात्यामार्फत एफआयडी योजना चालू आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेती उतारा, बँक खाते आणि आधारकार्डशी लिंक करून घ्यावे, स्पिंकलर, ठिबक सिंचनचा वापर करून पाण्याची बचत करावी. शेतीची अवजारे, 50 टक्के सबसिडीवर दिली जातात याचा लाभ घ्यावा. शेतामध्ये अचानक मृत्यू आल्यास दोन लाख, विष घेऊन आत्महत्या केल्यास पाच लाखाची मदत दिली जाते. बी बियाणे, खत याबाबतही यावेळी तक्रारी केल्या. उचगाव येथील केव्हीजी बँकेच्या अंदाधुंदी कारभाराबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. केव्हीजी बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन शाखा चालू करण्यासाठी तातडीने एनओसी द्यावी असा महत्त्वपूर्ण ठराव यावेळी केला.
दिवसा थ्री-फेज विद्युत द्या
हेस्कॉमने दिवसभर थ्री फेज विद्युत पुरवठा चालू ठेवावा अशी मागणीही केली. बसुर्तेनजीक रस्त्याच्या दुतर्फा ख•s खोदाई करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असा ठराव करण्यात आला. याबरोबरच अनेक खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या खात्यासंदर्भात माहिती दिली.









