वृत्तसंस्था/ सँटीयागो (चिली)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात बलाढ्या बेल्जियमने भारतावर 3-2 असा निसटता विजय मिळविला आहे.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने दर्जेदार आणि आक्रमक खेळावर भर दिला होता. सामन्यातल 5 व्या मिनिटाला नोआ स्क्रियुअर्सने बल्जियमचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत बेल्जियमने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. या सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाला आणि 42 व्या मिनिटाला फ्रान्स मॉटने बेल्जियमचा दुसरा गोल केला. 47 व्या मिनिटाला भारतीय संघातील अनुने पेनल्टी कॉर्नरवर आपल्या संघाचे खाते उघडले. 51 व्या मिनिटाला भारताला आणखी एक गोल नोंदविण्याची संधी मिळाली. पंचांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला आणि अनूने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल करुन बेल्जियमशी बरोबरी साधली. हा सामना बरोबरीत राहिल असे वाटत असताना बेल्जियमला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्यांच्या बोनामीने या संधीचा फायदा घेत बेल्जियमचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने विजयी सलामी देताना कॅनडाचा 12-0 अशा गोलानी दणदणीत पराभव केला होता. पण त्यानंतर गुरुवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने भारताचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला होता. आता क गटात भारतीय संघ दुसऱ्या स्थनावर असून त्यांनी 3 सामन्यातून 3 गुण मिळविले आहेत. या गटात बेल्जियमचा संघ आपले तिन्ही सामने जिंकून 9 गुणासह पहिल्या स्थानावर आहे.









