अब्जावधींच्या खजिन्यावरून व्हेनेझुएला-गुयाना आमनेसामने
वृत्तसंस्था/ कराकस
दक्षिण अमेरिकेतील दोन देशांनी परस्परांच्या विरोधात युद्धाची तलवार उपसली आहे. व्हेनेझुएला आणि त्याचा शेजारी देश गुयाना यांच्यादरम्यान घनदाट जंगलांनी भरलेल्या इस्सेक्यूइबो भागावरून तणाव वाढला आहे. व्हेनेझुएलाच्या लोकांनी अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारकडून करण्यात आलेल्या जनमत चाचणीत इस्सेक्यूइबो भागाला देशात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे. हा भाग अब्जावधी डॉलर्सच्या कच्च्या तेलाचा साठा आणि खनिजसाठ्यांनी समृद्ध आहे. याचमुळे व्हेनेझुएला त्यावर कब्जा करू पाहत आहे.
एक शतकापूर्वी दोन्ही देशांदरम्यान सीमानिश्चिती झाली होती, तेव्हा गुयानाने इस्सेक्यूइबो हा भूभाग गिळकृंत केला होता असा दावा व्हेनेझुएलाने केला आहे. जनमत चाचणीचा निकाल मादुरो हे लागू करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु गुयानाला संघर्षाची भीती सतावू लागली आहे. इस्सेक्यूइबो भागावर कब्जा करण्याच्या दिशेने व्हेनेझुएलाने पाऊल उचलले असल्याचे गुयानाला वाटतेय.
या जनमत चाचणीत इस्सेक्यूइबो भागात राहणाऱ्या लोकांना व्हेनेझुएलाचे नागरिकत्व देण्यासंबंधीही प्रश्न सामील आहे. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायाधिकार क्षेत्राला फेटाळण्याचा मुद्दाही यात आहे. या जनमत चाचणीनंतर व्हेनेझुएला आणि गुयाना यांच्यात युद्ध होण्याचा धोका वाढला आहे. इस्सेक्यूइबो भाग हा गुयानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतीयांश इतका आहे. व्हेनेझुएला दीर्घकाळापासून या भूभागावर स्वत:चा दावा सांगत आहे.
व्हेनेझुएलाने 1899 मधील आंतरराष्ट्रीय मध्यस्थांकडून करण्यात आलेला करारही नाकारला आहे. या मध्यस्थीदरम्यान गुयानाला ब्रिटिश वसाहत घोषित करण्यात आले होते. अलिकडेच इस्सेक्यूइबो भागात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे मिळाल्यावर हा वाद वाढला आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आता जनतेच्या भावनांवर स्वार होत इस्सेक्यूइबो भूभागावर कब्जा मिळवू पाहत आहेत.









