वृत्तसंस्था/ रायपूर
गेल्याच महिन्यात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघाकडून शौकिनांची चांगलीच निराशा झाली. या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. तर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या निराशजनक कामगिरीनंतर सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियावर 3-1 अशी विजयी आघाडी घेत थोडी समाधानकारक कामगिरी केल्याचे प्रतिपादन सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने केले आहे.
या मालिकेतील शुक्रवारी येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करुन विजयी आघाडी मिळविली आहे. या विजयामुळे भारताने ही मालिका काबिज केली आहे. या सामन्यात गायकवाडने 28 चेंडूत 32 धावा जमविल्या होत्या. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी गायकवाडची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मागील पराभवाची आठवण विसरुन पुन्हा नव्या जोमाने या मालिकेत भारतीय संघाने आगेकूच केली आहे. पुढील वर्षी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. आतापासूनच भारतीय संघाने या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपल्या पूर्व तयारीला प्रारंभ केला असल्याचे गायकवाडने म्हटले आहे.









