युवा समितीचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला जातो. यावर्षी सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य महामेळावा होणार असून या महामेळाव्याला मोठ्या संख्येने सीमावासीय उपस्थित रहातील, असा निर्धार युवा म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली टिळकवाडी येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठी भाषिकांनी महामेळाव्याला उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कन्नड संघटनांनी मराठी व इंग्रजी फलकांना लक्ष्य करून जो धुडगूस घातला, त्याचा बैठकीमध्ये निषेध करण्यात आला. पोलिसांदेखत असे प्रकार होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत तालुकाप्रमुख मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी विचार मांडले. यावेळी उपाध्यक्ष राजू कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, महेश जाधव, आकाश भेकणे, आनंद पाटील, विशाल अणवेकर यासह इतर उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.









