150 रुपये किलो : थंडीमुळे अधिक पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
चिकनच्या दरात घसरण झाली आहे. 220 ते 240 रुपये किलो असणारे चिकन 150 रुपयांवर आले आहे. त्यामुळे चिकन खवय्यांची चंगळ होवू लागली आहे. हिवाळ्यात सहसा चिकनचा दर वाढत असतो. मात्र यंदा हिवाळ्यात चिकनचा दर कमी झाल्याने मागणी देखील वाढु लागली आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य होवू लागले आहे. डाळी आणि कडधान्याच्या किंमती भरसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येवू लागल्या आहेत. मध्यंतरी चिकनचा दर 240 रुपयांपर्यंत गेला होता. मात्र आता पुन्हा चिकन दर खाली येवू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र तुरडाळ 180 रुपये किलो आहे. त्या तुलनेत चिकनचा दर कमी आहे. परिणामी तुरडाळीपेक्षा चिकन परवडले, असे म्हणत चिकनची खरेदी होवू लागली आहे.
याबरोबर मटण 680 तर अंडी शेकडा 550 रुपये अशी विक्री सुरू आहे. थंडीमुळे चिकन आणि अंड्यांना पसंती मिळू लागली आहे. मटण आणि अंड्यांच्या तुलनेत चिकनची मागणी वाढत आहे. किराणा कडधान्य आणि डाळींच्या किमती भरमसाट वाढल्याने ग्राहकांकडून चिकन खरेदी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून थंडी आणि किरकोळ पावसाचा शिडकावा सुरू आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे गर्मी वाढविणाऱ्या चिकनला पसंती दिली जात आहे.
आवक वाढल्याने दरात घट : उदय घोडके-मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष
हिवाळा सुरू असला तरी चिकनचे दर कमी झाले आहेत. बॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे कोंबड्यांची आवक वाढू लागली आहे. परिणामी बाजारात चिकनच्या दरात घट झाली आहे.









