तालुका म. ए. समितीचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा यशस्वी करण्यासाठी जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. विविध भागांमध्ये जनजागृतीला सुरुवात झाली असून या महामेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. गुरुवारी तालुका म. ए. समितीची बैठक झाली होती. त्यानंतर जनजागृती कमिटीने याला सुरुवात केली होती.
मध्यवर्ती म. ए. समितीवर सदस्य निवडीसाठी कमिटी करण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी दिली होती. मात्र अशी कोणतीही कमिटी करण्यात येणार नाही, असा खुलासा करत सध्या केवळ जनजागृतीसाठीच कमिटी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. विविध गावांत सध्या जनजागृतीचे काम सुरू असून शनिवारी बेळगुंदी, हलगा, देसूर, धामणे या गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तर रविवार दि. 3 रोजी कडोली, येळ्ळूर, काकती, कंग्राळी खुर्द आणि बुद्रुक या गावांमध्ये जागृती केली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी महामेळावा भरविण्यात येणार आहे. त्या महामेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानुसार आता प्रत्येक गावांमध्ये म. ए. समितीचे कार्यकर्ते जनजागृती करत आहेत. यामुळे प्रशासन परवानगी देवो अथवा न देवो मेळावा हा भरविणारच, असे स्पष्ट केले आहे.









