उचगाव-सुळगा भागातील समिती कार्यकर्त्यांचे आवाहन
उचगाव/ वार्ताहर
सुवर्णसौध येथे 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी समितीतर्फे व्हक्सिन डेपो येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला उचगाव, तुरमुरी, सुळगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे आदी परिसरातील हजारो मराठी बांधवांनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कर्नाटक सरकारला मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये हा भाग सामील होण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वांनी या मेळाव्यात आपली उपस्थिती दाखवावी, असे आवाहन समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी शुक्रवारी केले. उचगाव, सुळगा परिसरात महामेळावा जागृतीसाठी फेरी आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
उचगाव येथील मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी मराठा बँकेची माजी चेअरमन लक्ष्मण होनगेकर, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, सदानंद पावशे, अशोक हुक्केरीकर, अंकुश पाटील, अरुण जाधव, आप्पाजी सुळगेकर, शिरीष पावशेसह मान्यवर उपस्थित होते.
सुळगा येथे महामेळाव्याची जनजागृती
सुळगा (हिं.) येथेही महामेळाव्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी सुळगा या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे म्हणाले, बेळगावचा सीमाप्रश्न न्यायालयात असतानादेखील या ठिकाणी अधिवेशन भरविले जाते. तसेच बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याबरोबरच कन्नड सक्तीही केली जात आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.









