आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी व्यक्त केलेला अंदाज
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी जर चाहत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नवनवीन मार्ग चोखाळले आणि सुधारणा करत राहिले, तर लीगच्या मीडिया हक्कांचे मूल्य पुढील दोन दशकांत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. लीगचे सध्याचे मीडिया हक्क मूल्य 2022 पासून सुरू झालेल्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 6.2 अब्ज डॉलर्स (अंदाजे 48000 कोटी रुपये) इतके आहे.
या अंदाजानुसार देखील आयपीएल ही राष्ट्रीय फुटबॉल लीगनंतरची दुसरी सर्वाधिक उच्च मूल्य असलेली लीग ठरते. कारण अमेरिकी क्रीडासंस्थेने गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या 11 वर्षांच्या कालावधीसाठी 110 अब्ज डॉलर्सचा मीडिया हक्क करार केला आहे. ‘जर गेल्या 15 वर्षांतील वाटचाल पाहिली आणि पुढचा अंदाज घ्यायचा झाला, तर 2043 पर्यंत आयपीएलचे मीडिया हक्क 50 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे धुमल म्हणाले. धुमल येथे आरसीबी इनोव्हेशन लॅबच्या ‘लीडर्स मीट इंडिया’मध्ये बोलत होते.
धुमल हे बीसीसीआयचे माजी खजिनदार देखील आहेत. त्यांनी महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) आगमनामुळे आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशामुळे चांगले आर्थिक परिणाम होण्याची आशा व्यक्त केली आहे. आम्ही नवनवीन मार्ग चोखाळत राहण्याची गरज आहे, चाहत्यांचा विचार करून आणि खेळाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक चांगल्या सुधारणा करत राहणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आता क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग बनणार आहे आणि महिला प्रीमियर लीगने महिला क्रिकेटला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे. त्यामुळे मला खूप उज्ज्वल भवितव्य दिसत आहे, असे धुमल म्हणाले. आयपीएलचे मीडिया हक्क मूल्य गेल्या दशकात झपाट्याने वाढले आहे आणि 2008 मधील 6000 कोटी ऊपयांच्या तुलनेत निम्म्याने वाढले आहे. जगभरातील इतर अनेक मोठ्या क्रीडा लीगना त्याने मागे टाकले आहे. धुमल यांनी आयपीएलची वाढ आणि सतत वाढत चाललेली लोकप्रियता यांचे विश्लेषण केले. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. व्यक्तिश: मला वाटते की, आयपीएल हा स्वातंत्र्यानंतरचा मेक इन इंडियाचा सर्वोत्कृष्ट ब्रँड आहे, असे त्यांनी सांगितले.









