वृत्तसंस्था/ विजयवाडा
राष्ट्रीय मानांकन चॅम्पियनशिप टेबल टेनिस स्पर्धेत शुक्रवारी अनुभवी आणि वयस्कर टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू जी. साथीयान यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र टॉप सिडेड मानव ठक्करला दिल्लीच्या यशनीष मलिककडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात जी. साथीयानने आरबीआयच्या राज मोंडलचा तर सहाव्या मानांकित एस. शरथने रेल्वेच्या आकाश पालचा 3-2 अशा सम फरकाने पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. अन्य एका सामन्यात पीएसपीबीच्या सौरभ शहाने हवाई दलाच्या तृतीय मानांकित स्नेहीतवर 3-2 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे अॅन्थोनी अमलराजने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवताना मनुष शहावर 3-1 अशी मात केली. रेल्वेच्या रोनित भांजाने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू सनील शेट्टीवर 3-2 अशी मात केली.
महिलांच्या विभागात मोमिता दत्ता आणि स्वस्तिका घोष यांना पराभव पत्करावा लागला. तामिळनाडूच्या यशसिनी शिवशंकरने मोमिता दत्ताचा 3-2 तर रेल्वेच्या अनुषा कुटुंबालेने स्वस्तिका घोषचा 3-2 असा पराभव केला. टॉप सिडेड श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.









