नवी दिल्ली :
दिल्लीत गाजत असलेल्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना अटक झाल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, की कारागृहातून राज्य चालवावे, या संबंधीचा निर्णय आम आदमी पक्ष जनतेला विचारुन घेणार आहे. त्यासाठी पक्षाने ‘मैं भी केजरीवाल’ या अभियानाचा प्रारंभ दिल्लीत केला आहे. केजरीवाल यांना अटक करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. आमचे हात स्वच्छ आहेत. तरीही आम आदमी पक्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजप वेगवेगळे डाव टाकत आहे. आम्ही भाजपला जनतेसमोरच उघडे पाहणार आहोत. तसेच पुढील धोरण दिल्लीच्या जनतेला विश्वासात घेऊनच निर्धारित करणार आहोत, असे पक्षाचे म्हणणे आहे. मै भी केजरीवाल हे स्वाक्षरी अभियान आहे. पक्षाच्या धोरणासंबंधी लोकांचे मत या अभियानाच्या अंतर्गत लक्षात घेतले जाणार आहे. यासाठी लोकांशी व्यापक संवाद साधला जाणार आहे. त्यांना काही प्रश्न विचारुन त्यांची उत्तरे घेतली जातील. मतदारांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जातील. . जनतेच्या इच्छेचे परीक्षण केले जाईल, असे पक्षनेते गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.









