खोची / भानुदास गायकवाड
सध्या जिल्ह्यामध्ये रेशन दुकानातून प्लास्टिकचा तांदूळ, गहू वितरित होत असल्याच्या अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे येत असल्याच्या पाहायला मिळत आहेत. मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ आहे. हे पुरवठा विभागाकडून नागरिकांना जनजागृतीद्वारे सांगण्याची मोठी गरज आहे. सध्या या फोर्टीफाईड तांदळाबाबत जनजागृती ही मोठी काळाची गरज आहे.
या तांदळाबाबत ग्रामीण भागातील कोणत्याही ग्राहकाला याची माहिती नाही. विशेषता महिलांना याबाबत कसलीही माहिती नाही. त्यामुळे महिला हा प्लास्टिकचा तांदूळ आहे, असे सांगून एकमेकात गैरसमज निर्माण करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात रेशनवरील मिळणाऱ्या गहू तांदळाविषयी मोठी भेसळ असल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे रेशनचे धान्य नेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकात मोफत धान्याविषयी भीती दिसत आहे.
सामान्य नागरिकांना पोषणमूल्यांचा डोस मिळावा.यासाठी केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून ह्या फोर्टीफाईड तांदळाचा पुरवठा केला जात आहे. त्यावेळीच हा तांदूळ कोल्हापूर जिल्ह्यात पण पुरवठ्यासाठी वितरित होणाऱ्या तांदळामधून वितरित केला जाणार असल्याचे जाहीर झाले आहे. हा तांदूळ सध्या पूर्ण क्षमतेने वितरित होत नाही. पण थोड्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. त्यामुळेच वाटप झालेल्या तांदळात काही तांदूळ प्लास्टिक सदृश असल्याच्या तक्रारी येत आहेत.
हा तांदूळ सामान्य तांदळाच्या रंगापेक्षा साधारण वेगळ्या रंगाचा, पिवळसर आहे. वजनाने हलका असल्याने तो प्लास्टिक सदृश दिसतो. तांदळाचे काही दाणे पाण्यावर तरंगतात, तर काही तरंगत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात याबाबत शंका, कुशंका निर्माण झाले आहेत.
फोर्टीफाईड तांदूळ हा नेहमीच्या भातापेक्षा जास्त पौष्टिक असतो. त्यात वेगवेगळ्या पौष्टिक अन्न घटकांचा समावेश करून तयार करुन मिसळला जातो. हा तांदूळ बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. तांदूळ बारीक करून त्याची पावडर तयार केली जाते. यानंतर या पावडरीमध्ये पोषक तत्वे असलेली पावडर मिसळली जाते. आणि सर्व एकत्रित करून पावडर मळून घेवून पीठ केले जाते.मळलेले पीठ वाळवून तांदळाचा आकार दिला जातो.जेणेकरून तो तांदूळ आपल्या रोजच्या भातासारखा दिसतो.आता हे फोर्टीफाईड तांदूळ सामान्य भातामध्ये मिसळले जातात आणि तांदूळ वापरण्यासाठी तयार होतात.
असा आहे फोर्टीफाईड तांदूळ
फोर्टीफाईड तांदूळ लोह आणि जीवनसत्वाने समृद्ध आहे.विटामिन ए, व्हिटॅमिन बी १,विटामिन बी १२,फॉलिक सीड,लोह आणि झिंक या सर्व पोषक घटकांचे मिश्रण यामध्ये आहे.आहारात आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्याबरोबरच कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा तांदूळ मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे असे शासनाचे मत आहे. त्यामुळे लोकांना या फोर्टीफाईड तांदळाची सवय लागणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी जनजागृती हा मुद्दा महत्त्वाचा आहे.