50 इलेक्ट्रीक बसेसचा समावेश : जुन्या बसेस स्क्रॅपमध्ये
प्रतिनिधी/ बेळगाव
नववर्षात परिवहनच्या ताफ्यात नवीन 150 बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहनची बस कमतरतेची समस्या मिटणार आहे. यामध्ये 50 इलेक्ट्रीक बसेसचा समावेश आहे. बस कमतरतेमुळे सार्वजनिक बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नववर्षात नवीन बसेस आधार ठरणार आहेत.
निधीची चणचण, राज्य सरकारकडून अनुदानाचा अभाव आदी कारणांमुळे परिवहनच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसवर परिवहनचा डोलारा सुरू आहे. मात्र येत्या डिसेंबरमध्ये जुन्या बसेस स्व्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत. त्यामुळे परिवहनच्या बससेवर पुन्हा ताण वाढणार आहे. यासाठी राज्य सरकारने परिवहनला तातडीने नवीन बस द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
मागीलवर्षी परिवहनने बीएमटीसीकडून 50 जुन्या बस खरेदी केल्या आहेत. मात्र 15 वर्षांहून अधिककाळ वापरलेल्या बसेस नादुरुस्त होऊन रस्त्यावर बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात त्या स्व्रॅपमध्ये काढाव्या लागणार आहेत. यासाठी राज्य सरकारने परिवहनला देण्यात येणाऱ्या 150 बसेस तात्काळ उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
बेळगाव बसस्थानकातून दैनंदिन 465 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. त्यापैकी 150 बसेस शहरांतर्गत आणि ग्रामीण भागात धावतात. मात्र यामध्ये आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान नादुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे परिवहनच्या बस व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. परिवहनने नवीन बसेस मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून मागणी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने बस देण्यासाठी हिरवाकंदील दाखविला आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दाखल होणाऱ्या बसेस तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहेत.
प्रदूषण टाळण्याबरोबरच खर्चाची बचत करण्यासाठी परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. येत्या जानेवारीपासून विविध मार्गांवर इलेक्ट्रीक बस धावणार आहेत. हुबळी-धारवाड याठिकाणी इलेक्ट्रीक बस सुरू आहेत. लवकरच बेळगाव बसस्थानकात इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासाठी बसस्थानकात चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे.
शक्ती योजना सुरू झाल्यापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बससेवेवर ताण वाढला आहे. त्यातच जुन्या बसेस वाहतुकीदरम्यान नादुरुस्तीचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी सार्वजनिक बससेवा विस्कळीत होऊ लागली आहे. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
ए. वाय. शिरगुप्पीकर-डेपो मॅनेंजर
येत्या नवीन वर्षात परिवहनच्या ताफ्यात 150 बसेस येणार आहेत. त्यामध्ये 50 बसेस या इलेक्ट्रीक आहेत. शहरात 50 तर इतर लांबपल्यासाठी 100 बसेस पाठविल्या जातील. जुन्या बसेस कमी केल्या जाणार आहेत. वाहतुकीदरम्यान अडचणी येत असल्याने आयुर्मान संपलेल्या बसेस स्व्रॅप केल्या जाणार आहेत.









