वृत्तसंस्था/ लखनौ
अव्वल बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. मंगळवारपासून या सुपर 300 स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य मिळविणाऱ्या प्रणॉयने पाठदुखीतून सावरल्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती तर कॅनडा ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या लक्ष्य सेनला ऑगस्टनंतच्या गेल्या सहा स्पर्धांत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. भरगच्च आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असल्याने तसेच ऑलिम्पिक पात्रता मिळवायची असल्याने पुढील मोसमासाठी ताजेतवाने राहण्यासाठी खेळाडू प्रयत्न करीत आहेत. 30 एप्रिलपर्यंतच्या स्पर्धांत खेळाडूंना पात्रता मिळवावी लागणार आहे. ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू देखील दुखापतीतून सावरत असल्याने या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये किदाम्बी श्रीकांत एकमेव वरचे मानांकन मिळालेला खेळाडू या स्पर्धेत आहे.









