नासा प्रमुख बिल नेल्सन भारत दौऱ्यावर : चांद्रयान-3 च्या यशाबद्दल केले अभिनंदन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचण्यासाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी मंगळवारी केली आहे. भारत ही मोठी अंतराळशक्ती असून चांद्रयान-3 मोहीम एक मोठी कामगिरी असल्याचे नेल्सन यांनी म्हटले आहे. नासा प्रमुखांचा हा 7 दिवसीय भारत दौरा एनआयएसएआर अंतराळयानाच्या तयारींच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
एनआयएसएआर हा भारत आणि अमेरिकेच्या अंतराळ संस्थांचा पृथ्वीवर देखरेख ठेवण्याचा संयुक्त उपक्रम आहे. हा उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित केला जाणार आहे. सध्या या उपग्रहासंबंधी परीक्षण सुरू आहे. याला नाइसार असे देखील म्हटले जाते. नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडारचे हे संक्षिप्त रुप आहे. यात इस्रो आणि नासाची समान हिस्सेदारी आहे. दोन्ही देशांच्या यंत्रणांनी पहिल्यांदाच अर्थ ऑब्जर्वेटरी मिशनसाठी पहिल्यांदाच हातमिळवणी केली आहे.
हा उपग्रह इस्रोकडून निर्मित रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. नासा आणि इस्रोच्या पहिल्या उपग्रहीय मोहिमेच्या स्वरुपात नाइसार एक क्रांतिकारक पुढाकार ठरणार आहे, ज्याद्वारे पृथ्वीवरील बदलते वातावरण, परिवर्तनीय पृष्ठभाग, बर्फ, बायोमास, नैसर्गिक आपत्ती, वाढती सागरी पातळी, भूजल, हवामान बदल आणि कृषीविषयी सर्व आवश्यक माहिती मिळणार आहे. इस्रो आणि नासादरम्यान भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे नेल्सन यांनी म्हटले आहे.
भारत भविष्यातील मोठा सहकारी
इस्रो सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी भारतीय अंतराळवीरांना सज्ज करण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देत आहे. अंतराळात अंतराळवीरांसाठी भारत भविष्यातील अत्यंत मोठा सहकारी आहे. अमेरिका 2024 मध्ये खासगी लँडर्सना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु भारताने सर्वप्रथम येथे पोहोचण्याची कामगिरी केली असल्याचे नेल्सन यांनी म्हटले आहे.
अंतराळ सहकार्यासंबंधी चर्चा
नेल्सन हे स्वत:च्या दौऱ्यात अंतराळ सहकार्यावरून भारतीय अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. तर बुधवारी बेंगळूर येथे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांना ते भेटतील. राकेश शर्मा यांना यापूर्वी 1991 मध्ये भेटलो होतो. राकेश यांच्या भेटीकरिता आपण अत्यंत उत्सुक आहे. परंतु मागील 31-32 वर्षांमध्ये त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले असल्याचे नेल्सन यांनी नमूद केले आहे.









