वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विशाखापट्टणम श्रेणी म्हणजेच 15 बी प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेली युद्धनौका ‘इंफाळ’च्या क्रेस्टचे मंगळवारी अनावरण करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यावेळी उपस्थित होते.
युद्धनौका इंफाळच्या क्रेस्टचे अनावरण हे मणिपूरच्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता दिलेल्या बलिदानाला वाहिलेली खरी श्रद्धांजली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी पोहोचलेले मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिल्लीत नौदलाच्या अधिकारी आणि जवानांची भेट घेतली आहे. यादरम्यान नौदल प्रमुख आर. हरि कुमार यांनी इंफाळ युद्धनौकेवरील नौसैनिक, अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
आयएनएस इंफाळ ही युद्धनौका दीर्घ पल्ल्याचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्यास देखील सक्षम आहे. ईशान्येतील एखाद्या शहराचे नाव देण्यात आलेली ही नौदलाची पहिलीच युद्धनौका आहे. 16 एप्रिल 2019 रोजी तत्कालीन राष्ट्रपतींनी या नावाला मंजुरी दिली होती. या युद्धनौकेची सर्व परीक्षणे पार पडली आहेत. 23 डिसेंबर 2023 रोजी या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार आहे. द क्रेस्ट ऑफ यार्ड (इंफाळ) प्रोजेक्ट 15 बी गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर सीरिजमधील तिसरी युद्धनौका आहे. याची निर्मिती मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून करण्यात आली आहे.
या युद्धनौकेचे डिझाईन भारतीय नौदलाचे वॉरशिप डिझाईन ब्युरोकडून तयार करण्यात आले आहे. भारतात निर्माण करण्यात आलेली ही युद्धनौका जगातील आधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे. या युद्धनौकेत एमआर एसएएम, ब्राह्मोस एसएसएम, टॉरपीडो ट्यूब लाँचर्स, अँटी सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि 76 एमएम एसआरजीएम यासारखी आधुनिक शस्त्रs आणि क्षेपणास्त्रs तैनात आहेत.









