दोघा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी : कारवाई करून अहवाल देण्याची सूचना
बेळगाव : गोवावेस येथील खाऊ कट्ट्याचे नियमबाह्या बांधकाम, गाळे वाटपातील पक्षपातीपणा आदीसंदर्भातील तक्रारींची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष पथकाकडून चौकशी सुरू असतानाच यासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली असून आपल्या कुटुंबीयांच्या नावे गाळे घेणाऱ्या दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे. या निवेदनाची दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले असून जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून यासंबंधी कारवाई करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे दोघांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
सुजित मुळगुंद यांनी 9 नोव्हेंबर रोजी प्रादेशिक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. वॉर्ड क्रमांक 23 चे नगरसेवक जयंत जाधव व वॉर्ड क्र. 41 चे नगरसेवक मंगेश पवार यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती. या दोघा जणांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून सरकारी खात्याकडून बांधलेल्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आहे. याकडे प्रादेशिक आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले होते. खाऊ कट्ट्यातील गाळा क्र. 29 हा सोनाली जयंत जाधव यांनी तर 28 क्रमांकाचा गाळा निता मंगेश पवार यांनी घेतला आहे. केएमसी कायदा 1976 कलम 26(1)(के) चे स्पष्टपणे उल्लंघन झाल्याची तक्रार केली असून याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना कारवाई करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. गरज भासल्यास स्पष्ट अभिप्राय व दाखले देण्याची सूचनाही सोमवारी बजावलेल्या आदेशात केली आहे.









