वार्ताहर /उचगाव
सुळगा तसेच परिसरातील लाभार्थी महिलांना मोफत गॅस शेगडी सिलिंडर वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम भागातील महिला लाभार्थ्यांना पाचव्या टप्प्यातील मोफत गॅस शेगडी सिलिंडरचे वितरण करण्यात आले. ग्रा.पं. सदस्य शट्टूपा उर्फ बाळू पाटील यांनी गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देताना साठ महिलांना मोफत गॅस शेगडी व सिलिंडरचे वाटप केले. याशिवाय हिंडलगा, विजयनगर, बेकिनकेरे, सावगाव, हंगरगा, मंडोळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, उचगाव, अतिवाड, आंबेवाडी, गोजगे गावातील महिला लाभार्थ्यांनाही सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, माजी अध्यक्ष विनय कदम, ग्रा. पं. सदस्य शट्टूपा उर्फ बाळू पाटील, कल्लेहोळचे अनिल पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुरज पाटील यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव पश्चिम भागामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिसरात जनजागृती करून या योजनेचा महिलांना लाभ मिळवून दिला आहे. खासदार मंगल अंगडी यांनी दहा हजार कुटुंबांसाठी ही योजना मंजूर करून दिली आहे. गरजू महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस शेगडी सिलिंडर मिळवून देण्यासाठी आशिष कालकुंद्री हे प्रयत्नशील आहेत.या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या योजनेसाठी अभिषेक कालकुंद्री, व्यवस्थापक नारायण बिष्णोई, अशोक मयेकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.









