वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या सामन्यात त्रिपुरा संघाकडून विद्यमान विजेत्या सौराष्ट्रला पराभवाचा धक्का मिळाला आहे. अन्य सामन्यात मुंबईने रेल्वेचा, विदर्भने महाराष्ट्राचा तर कर्नाटकाने दिल्लीचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केले आहेत.
सौराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्यातील अ गटाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराने 50 षटकात 8 बाद 258 धावा जमविल्या. विक्रमकुमार दास, सुदीप चटर्जी, गणेश सतीश यांनी अर्धशतके झळकविली. सौराष्ट्रतर्फे जयदेव उनादकटने 35 धावात 5 गडी बाद केले. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव 31.4 षटकात 110 धावात आटोपला. चेतेश्वर पुजाराने 24 धावा केल्या. त्रिपुरातर्फे देबने 15 धावात 5 तर मुरासिंगने 13 धावात 2 गडी बाद केले.
मुंबई आणि रेल्वे यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 50 षटकात 5 बाद 324 धावा जमविल्या. जय बिस्तने 144, सुवेद पारकरने 57, पवारने 41 धावा केल्या. त्यानंतर रेल्वेने 50 षटकात 9 बाद 298 धावा जमविल्या. उपेंद्र यादवचे शतक (102), तसेच विवेक सिंगची 95 धावांची खेळी वाया गेली. मुंबईतर्फे अवस्थीने 4 तर तुषार देशपांडने 3 गडी बाद केले.
विदर्भ संघाने महाराष्ट्राचा 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 40 षटकात 8 बाद 255 धावा केल्या. ओम भोसलेने 82, अंकित बावनेने 82, नाईक 47 धावा जमविल्या. विदर्भतर्फे दर्शन नलकांडेने 34 धावात 5 गडी बाद केले. त्यानंतर विदर्भने 39.1 षटकात 5 बाद 261 धावा जमवित विजय नोंदविला. अथर्व तायडेने 60, मोखाडेने 61, हर्ष दुबेने नाबाद 56, एस दुबेने नाबाद 62 धावा केल्या. क गटातील अन्य एका सामन्यात कर्नाटकाने दिल्लीचा 6 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा डाव 36.3 षटकात 143 धावात आटोपला. बदोनीने 100 धावा झळकविल्या. कर्नाटकातर्फे कवीरप्पा, कौशिक यांनी प्रत्येकी 3 तर विजयकुमारने 2 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाने 27.3 षटकात 4 बाद 144 धावा जमवित हा सामना जिंकला. देवदत्त पडीकल्लने 70 तर मनीष पांडेने नाबाद 60 धावा केल्या. अन्य एका सामन्यात मध्यप्रदेशने पंजाबचा 89 धावांनी पराभव केला. या सामन्यात मध्यप्रदेश संघाने 50 षटकात 177 धावा जमविल्यानंतर पंजाबचा डाव केवळ 89 धावात आटोपला. इ गटातील सामन्यात तामिळनाडूने बंगालचा 5 गड्यांनी पराभव केला.









