वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकणारा कर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलांमुळे पंजाबने उपांत्य लढतीत कर्नाटकचा 5-1 असा एकतर्फी पराभव करीत 13 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. तसेच हरियाणाने तामिळनाडूचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
हरमनप्रीतने 39 व 44 व्या मिनिटाला गोल नोंदवले. त्याआधी मिडफिल्डर शमशेर सिंगने चौथ्या मिनिटाला भारताचे खाते उघडले होते. सुखजीत सिंगने 13 व्या मिनिटाला तर आकाशदीप सिंगने 45 व्या मिनिटाला पंजाबचे उर्वरित दोन गोल केले. कर्नाटकचा एकमेव गोल बी. आभारन सुदेवने 18 व्या मिनिटाला नोंदवला. पंजाबची अंतिम लढत हरियाणाशी होणार आहे.
दुसऱ्या उपांत्य लढतीत हरियाणाने तामिळनाडूचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांत 1-1 अशी बरोबरी झाली होती. अभिषेकने 41 व्या मिनिटाला गोल नोंदवून हरियाणाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराच्या सुमारास बीपी सोमन्नाने तामिळनाडूला बरोबरी साधून देणारा गोल नोंदवल्याने नंतर शूटआऊट घेण्यात आले. शूटआऊटमध्ये संजय, रजंत, अभिषेक, जोगिंदर सिंग यांनी हरियाणचे गोल केल्यानंतर गोलरक्षक पवनने दोनदा अप्रतिम बचाव करीत संघाला विजय मिळवून दिला.









