मंत्री सतीश जारकीहोळी : संविधान समर्पण दिन
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांतून साकारलेले संविधान प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. यासाठीच राज्य सरकारकडून सरकारी कार्यक्रमांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान वाचन करण्याची सक्ती केली आहे. संविधान समजून घेणे काळाची गरज असून आपल्याला न्याय, हक्क मिळवून देणाऱ्या संविधानाबद्दल प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. येथील डॉ. आंबेडकर उद्यानामध्ये संविधान समर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांतून संविधान निर्माण करण्यात आले आहे. यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. संविधानाचा उद्देश व महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. आपल्याला दिलेले अधिकार, हक्क व जबाबदारी समजून घेतली पाहिजे. सरकारला दिलेले अधिकार व सरकारची कार्यप्रणाली या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. संविधानामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. आरक्षण मिळाले आहे, महिलांना प्रसूती रजा मिळाली आहे. याबरोबरच कामगारांना 8 तास काम करण्याचे अधिकारही संविधानामुळेच मिळाले आहेत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही संविधानाची मुख्य वैशिष्ट्यो आहेत. त्यानुसार सर्वांनी संविधानाबद्दल जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह संविधान वाचन केले. संविधानाला एकनिष्ठ राहून सरकारी अधिकाऱ्यांनी कार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, बाबू पुजारी, आकाश हलगेकर, महेश कोलकार, के. डी. मंत्रेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









