कार्तिक महिन्याच्या आणि चातुर्मासाच्या शेवटी तुळशी विवाह करण्याची वैदिक धर्मामध्ये परंपरा आहे. कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात विशेषत: कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. वैदिक अथवा भागवत धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी तुळशी विवाहापुरतेच तुळशीचे महत्त्व न ठेवता दैनंदिन जीवनामध्येसुद्धा तुळशीचे महत्त्व काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे.
तुळस ही भगवंताच्या चरणाशी स्थित असते म्हणून वैष्णवांना अतिशय प्रिय आहे. गौतमीय तंत्रमध्ये म्हटले आहे, तुळशी दल मात्रेनं जलस्य चुळूकेन वा । विकृणिते स्वम आत्मानं भक्तेभ्यो भक्त वत्सला ।। अर्थात ‘जे भक्त भक्तिभावाने भगवान कृष्णाला एक तुळशीचे पान आणि ओंजळभर पाणी अर्पण करतात त्यांना भगवंत स्वत:ला विकून टाकतात.’ याच आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते म्हणतात भक्ताहून देवा आवडते काइ । त्रिभुवनी नाही आन दुजे ।।1।। नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ।।2।। सर्वभावे त्याचें सर्वस्वे ही गोड । तुळसीदळ कोड कऊनि घ्यावे ।।3।। सर्वस्वे त्याचा म्हणवी विकीला । चित्त द्यावे बोला सांगितल्या ।।4।। तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणिक विठ्ठला धर्म नाही ।।5।। अर्थात ‘भगवान विठ्ठलाला भक्ताशिवाय त्रिभुवनामध्ये दुसरे काहीही आवडत नाही हे मी शपथ घेऊन सांगतो आहे. विठ्ठलाला वैकुंठ आवडत नाही आणि क्षीरसागर आवडत नाही. केवळ त्यांच्या दासांच्या अंत:करणामध्ये राहणे त्याला आवडते. दासांनी सर्वभावे त्याला काहीही अर्पण करू द्या त्या सर्वांचा तो विठ्ठल स्वीकार करतो आणि केवळ एक तुळशी दळ जरी त्याला वाहिले तरी त्याचे कोडकौतुक करून ते देखील विठ्ठल गोड मानून घेतो. माझ्या मते तर देव अशा भक्ताला विकला गेलेला आहे कारण भक्त जे काही काम देतील, जे काही बोलतील, त्यांच्या बोलण्याकडे आणि सांगितलेल्या कामाकडे विठ्ठल चित्त देऊन असतो. भक्तांच्या सुखांमध्ये विठ्ठल बांधला गेलेला आहे, भक्तांचे कार्य करण्यावाचून विठ्ठलाला दुसरा धर्मच नाही.’
आणखी एका अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण जरी महान असले तरी भक्तांकडून केवळ प्रेमाने अर्पण केलेले तुलशी दळ आणि थोडेसे पाणी स्वीकारून ते कसे संतुष्ट होतात याचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, लीळा विग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ।।1।। मांडीवरी भार पुष्पाचीये परी । बैसोनियां करी करी स्तनपान ।।2।। नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळीते माता हातें त्यासी ।।3।। हातें कुर्वाळुनी मुखी घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट घाले ।।4।। पोट घाले मग देतसे ढेंकर । भक्तीचे फार तुळशी दळ ।।5।। तुळशीदळ भावें सहित देवा पाणी । फार ते त्याहूनि क्षीरसागर ।।6।। क्षीराचा कंटाळा असे एक वेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ।।7।। देवां भक्त जीवांहूनि आवडती । सकळही प्रीती त्याच्या ठायी ।।8।। त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ।।9।। अर्थात ‘स्वत: विविध प्रकारची लीला करणारा भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या हाताने विविध प्रकारचे अलंकार व वस्त्रे नेसत होता व यशोदेच्या मांडीवर बसून स्तनपान करत असे. त्यावेळी यशोदेला तो फुलांसारखा हलका वाटत असे. नभाचाही साक्ष असलेला व पाताळाच्याही पलीकडे असलेल्या कृष्णाला यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळत होती. यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळून कृष्णाला घास भरवीत असे त्यावेळी कृष्ण यशोदा मातेला म्हणे ‘आता पुरे झाले माझे पोट भरले आहे’ पोट भरल्यानंतर कृष्ण ढेकर देत असे. अशा या कृष्णाला भक्तिपूर्वक तुळशीचे एक पान जरी भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केले तरी त्याला ते आवडते. एक वेळ क्षीरसागराचाही भगवंतांना कंटाळा येईल परंतु भक्ताने अर्पण केलेले तुळशी दळ आणि पाणी त्यांना प्रिय आहे. भगवंताना भक्त आपल्या जीवापेक्षाही जास्त आवडतो आणि भक्तांच्याच ठिकाणी भगवंतांचे सर्व प्रेम असते. हरी भक्तांचा अंकित असतो, भक्तांचा दास होतो आणि भक्तांचे कोणतेही काम तो तत्परतेने करतो.’
तुळशीचे आणखी एक नाव आहे वृन्दा आणि ती आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णाच्या अनेक लीलांचे आयोजन करते म्हणून त्या धामाचे नाव वृन्दावन आहे. पद्मपुराण व इतर अनेक शास्त्रामध्ये तुळशीची महती वर्णन केली आहे.
तुळस ही जरी नित्य भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आध्यात्मिक जगतामध्ये निवास करीत असली तरी विष्णुभक्तावर कृपा प्रदान करण्यासाठी आपल्यासमोर वृक्ष रूपामध्ये उपस्थित आहे म्हणून तिला साधारण वृक्ष समजू नये. तुळशी ही आपल्याला भगवंताच्या चरणाचा आश्र्रय कसा घ्यावा हे शिकवते. म्हणून याच सेवाभावनेने वैष्णव आपल्या गळ्यामध्ये तुळशीमाला धारण करतात. तुळशी माळ धारण करणे ह्याचा अर्थ आहे आपले जीवन भगवंताला समर्पित करणे. ह्याच समर्पित भावनेचे प्रतीक म्हणून भक्त भगवंताला तुळशीचे हार अर्पण करतात. तुळशीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणून तिचे नाव तुळशी आहे. यासाठी तुळशीला केवळ एक साधारण वृक्ष न समजता तिचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. काही लोक तुळशीला केवळ एक औषधी वृक्ष समजून तिचे संगोपन करतात.
भगवान श्रीकृष्णांना तुळशी अतिशय प्रिय आहे. म्हणून अनेक अभंगांमध्ये याचे वर्णन येते. संत तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।। 1।। तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ।।2।। त्याचप्रमाणे कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसे रूप डोळां दावीं हरी ।।1।। आणि तुळशीमाळ घालुनी कंठी । उभा विटेवरी जगजेठी ।।1।। अवलोकोनि पुंडलिका दृष्टी । असे भीमातटी पंढरीये ।।2।। इत्यादी.
आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रामाणिक विष्णुभक्तांना वैष्णव म्हणतात. असे वैष्णव आपल्या गळ्यामध्ये तुळशी कंठीमाला धारण करतात आणि घरासमोर तुळशी वृन्दावन लावून त्याची नित्यनियमाने पूजा करतात. अशा वैष्णवांच्या भाग्याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, सोलीव जें सुख अतिसुखाहूनी । उभे ते अंगणी वैष्णवांच्या ।।1।। वृंदावन सडे चौक रंगमाळा । नाचतो सोहळा देखोनियां ।।2।। भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठी ।।3।। नामवोघ मुखी अमृताचे सार । मस्तक पवित्र सहित रजें ।।4।। तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हे वासना त्याची करी ।।5।। अर्थात ‘जो अत्याधिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या अंगणात येऊन उभा राहतो. विष्णुभक्तांच्या अंगणात तुळशी वृन्दावन आहे, गायीच्या शेणाचा सडा घातला आहे, रांगोळ्या काढल्या आहेत, असा सर्व थाट पाहून भगवान विठ्ठल हर्षभराने नाचतो. असे वैष्णव भक्त गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतात व अंगावर बारा ऊर्ध्वपुंड तिलकाने सदा सुशोभित असतात. अमृताचे सार असे हरिनामामृत याचा ओघ वैष्णवांच्या मुखातून सतत वाहत असतो, आणि त्यांचे कपाळ हरिचरणांच्या पवित्र धुळीने सदैव माखलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णवांना हरिभक्तीशिवाय इतर म्हणजे मोक्षाची इच्छाही मनात येत नाही.’
आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात जयाचिये द्वारी तुळशीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ।। ज्याच्या द्वारासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर म्हणजे स्मशानाप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनाही उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ।।2।। म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।3।। ‘कंठामध्ये तुळशी माळा धारण करा आणि एकादशी सारखे पवित्र व्रताचे पालन करा, स्वत:ला हरीचे दास म्हणवून घ्या, एवढीच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे.’ ज्यांना ज्यांना आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करावयाचे आहे त्यांनीही या उपदेशाचे पालन करावयास हवे.
-वृंदावनदास








