मध्यप्रदेशमधील तरुणाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
आयटीबीपी (इंडो-टिबेटियन बॉर्डर फोर्स) सुरक्षा दलाच्या भरतीवेळी वैद्यकीय तपासणीसाठी एकाच्या बदल्यात दुसरा उमेदवार हजर झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून आपल्या मित्राच्या जागेवर हजर झालेल्या बोगस उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे.
आयटीबीपीच्या दिलेल्या फिर्यादीवर येथील काकती पोलीस स्थानकात छोटू देवेंदर सिंग (रा. गवा, सर्जनपूर, ता. जि. मुरैना, मध्यप्रदेश) व अंकित बसुदेव (रा. जनकपूर, ता. जि. मुरैना, मध्यप्रदेश) या दोघा जणांवर भादंवि 419, 420 कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार मध्यप्रदेशमध्ये आयटीबीपीसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत छोटू देवेंदर सिंगची निवड झाली होती. मात्र, वैद्यकीय तपासणीवेळी तो अपात्र ठरला. 23 नोव्हेंबर रोजी ही चाचणी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फेरचाचणीसाठी छोटूच्या बदल्यात अंकित हजर झाला.
संशय येऊन अंकितची चौकशी केली असता त्याने घडल्या प्रकाराची कबुली दिली. त्यानंतर काकती पोलीस स्थानकात संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंकितला अटक केली आहे.









