► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (पॅश फॉर क्वेरी) टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढत आहेत. आता सीबीआयने याप्रकरणी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. यापूर्वी संसदीय शिष्टाचार समितीने त्यांची चौकशी केली असून त्यासंबंधीचा अहवाल सभाध्यक्षांना सादर केला आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी ‘तपास समिती’ स्थापन करण्याची विनंती केली होती.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप करून चौकशीची मागणी केली होती. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रांविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या संसद लॉगिन आयडीवरून एका उद्योगपतीला लॉगिन करण्यासाठी पासवर्ड दिल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांवरून गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच घडामोडी सुरू आहेत.