युवकाच्या कुटुंबीयांचा शोध जारी
बेळगाव : गेल्या दहा दिवसांपूर्वी बेळगाव रेल्वे स्थानकावर अत्यवस्थ अवस्थेत आढळून आलेल्या एका युवकाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात येत आहे. कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 15 नोव्हेंबर रोजी एक युवक अत्यवस्थ अवस्थेत रेल्वे स्थानकावर आढळून आला. त्याचदिवशी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान तो केवळ नाव आणि गाव वगळता आपल्या कुटुंबीयांविषयी इतर कोणतीच माहिती देण्याच्या अवस्थेत नाही. मौलाम चंद्रान कडेरी (वय 30) असे त्याने आपले नाव सांगितले असून आपण मध्यप्रदेशमधील दामोल जिल्ह्यातील असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्याने आपल्या कुटुंबीयांविषयी कोणतीच माहिती दिली नाही. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून संबंधितांनी 0831-2405234 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.









