जागा देण्यास हंदूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध : जिल्हाधिकारी निर्णय घेणार : जवळपास जागा देण्याची हुलीकोत्तल ग्रामस्थांची मागणी
खानापूर : तालुक्यातील हंदूर ग्राम पंचायत क्षेत्रातील हंदूर आणि हुलीकोत्तल गावातील स्मशानभूमीच्या जागेबद्दलचा वाद चिघळला होता. यासाठी प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दोन्ही गावच्या नागरिकांची बैठक बोलावून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी हंदूर गावच्या नागरिकांनी हुलीकोत्तल गावाला 1 एकर 20 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी देण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून देऊ, त्यानंतरच वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे सांगून बैठक बरखास्त केली. बैठकीत तहसीलदार प्रकाश गायकवाड, खानापूर पोलीस निरीक्षक एम. गिरीश, महसूल अधिकारी एम. सिमाणी उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की, खानापूर तालुक्मयातील हंदूर ग्रामपंचायतमधील सर्व्हे नंबर 63 मधील 20 गुंठे जागा हुलीकोत्तल गावाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीसाठी मंजूर केली होती. हुलीकोत्तल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्मशानभूमीसाठी जादा जागा मंजूर करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हुलीकोत्तल गावाला आणखी 1 एकर जागा स्मशानभूमीसाठी मंजूर केली. यामुळे हंदूर ग्रामस्थ संतप्त झाले. हंदूर ग्रामस्थांनीही या स्मशानभूमीला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. गेल्या काही महिन्यापासून हा वाद चिघळला होता. यावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दोन्ही गावच्या नागरिकांची बैठक गुरुवारी दुपारी खानापूर तहसीलदार कार्यालयात बोलाविली होती. यावेळी दोन्ही गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1 एकर 20 गुंठे जागेविरोधात आक्षेप
यावेळी हंदूर येथील ग्रामस्थांनी 1 एकर 20 गुंठे स्मशानभूमीसाठी मंजूर केलेल्या जागेविरोधात जोरदार आक्षेप घेत जादाची जागा मंजूर करण्यात येऊ नये, तसेच या ठिकाणी स्मशानभूमीसाठी आमचा विरोध असून या ठिकाणी सध्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. भविष्यात या ठिकाणी माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, व्यायाम शाळा, मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच यासह इतर सार्वजनिक कामासाठी ही जागा वापरण्यात येणार असल्याने या जागेत हुलीकोत्तल गावच्या स्मशानसाठी जागा अजिबात मंजूर करण्यात येऊ नये, असा आक्षेप घेतला. त्यामुळे हुलीकोत्तल गावाला स्मशानसाठी जागा दिल्यामुळे साहजिकच शाळेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तसेच हंदूर गावची लोकसंख्या 2000 च्या आसपास असून हुलीकोत्तल गावची लोकसंख्या 800 च्या घरात आहे. असे असतानाही त्या गावाला दोन एकर जागा देण्यास विरोध असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर हुलीकोत्तल गावातील नागरिकांनी आम्हाला स्मशानभूमीसाठी गावच्या आसपास योग्य जागा देण्यात यावी, आमची कोणतीही तक्रार नाही, असे सांगितले.