वृत्तसंस्था/ लंडन
अफगाणचा अष्टपैलू रशिद खान याला अलिकडच्या कालावधीत वारंवार पाठ दुखापतीची समस्या सातत्याने जाणवत होती. या समस्येवर रशिद खानने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ब्रिटनमध्ये रशिद खानच्या पाठीच्या खालच्या बाजूवर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. सदर माहिती अफगाण क्रिकेट मंडळाने दिली आहे.
या दुखापतीतून रशिद खान लवकरच पूर्णपणे बरा होईल, असे सांगण्यात आले. या दुखापतीमुळे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. ब्रिटनमधील एका खाजगी रुग्णालयात डॉ. जेम्स अलीबोन यांनी रशिद खानच्या या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.









