भाजपच्या विशाल सभेला मिळाली मंजुरी
कोलकाता :
कलकत्ता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला झटका देत भाजपच्या सभेला हिरवा झेंडा दाखविला आहे. उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने 29 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात व्हिक्टोरिया हाउसनजीक भाजपच्या सभेला आयोजित करण्याची अनुमती देत पश्चिम बंगाल सरकारची याचिका फेटाळली आहे. भाजप 29 नोव्हेंबरला एका सभेचे आयोजन करणार आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या भाजपच्या रॅलीला अनुमती देणाऱ्या निर्णयाला बंगाल सरकारने आव्हान दिले होते. 20 नोव्हेंबर रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेख मंथा यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने भाजपच्या 29 नोव्हेंबरच्या सभेला अनुमती देत स्थानिक पोलिसांना फटकारले होते.
एका स्वतंत्र देशात कुणालाही कुठेही जाण्याची अनुमती आहे. पोलिसांकडे सभेला अनुमती नाकारण्यासाठी कुठलेच सबळ कारण नव्हते असे खंडपीठाने म्हटले होते. बंगालमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या विरोधात भाजपकडून ही सभा आयोजित करण्यात येणार आहे.









