सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रवेशद्वारातच शेतकऱ्यांनी मांडले ठाण
बेळगाव : शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शेतकरी भवनाचा गैरवापर होत असून सदर भवन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करत राष्ट्रीय रयत संघटनेतर्फे किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या व इतर कार्यक्रमांसाठी चर्चा करण्याकरिता सरकारकडून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मुख्य बसस्थानकाशेजारी शेतकरी भवन उभारण्यात आले आहे. मात्र या भवनाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग होताना दिसत नाही. सदर भवन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र यामध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत. शेतकरी भवनाचा शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोग न होता इतर कामांसाठी त्याचा उपयोग केला जात आहे. याठिकाणी बार, हॉटेल आदी व्यवसाय थाटण्यात आले आहेत, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. 1966 मध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भवन उभारण्यात आले होते. मात्र याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी व्हावा यादृष्टिने लोकप्रतिनिधींकडून कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राजकीय नेत्यांसाठी सरकारी विश्रामगृहे निर्माण करण्यात आली आहेत. या देशाला अन्न देणाऱ्या अन्नदात्याला मात्र त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांकडून याठिकाणी मौजमज्जाच केली जाते, असा आरोपही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून करण्यात आला.
अधिकाऱ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
शेतकऱ्यांच्या नावे असणारे शेतकरी भवन शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही शेतकरी संघटनेकडून देण्यात आला. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नायक, राजू पवार आदी उपस्थित होते. सकाळपासून दुपारपर्यंत आंदोलन केले तरी कोणत्याच अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.









