दलित संघटनेचे समाज कल्याण वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तालुका समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून दलित विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत दलित संघटनांकडून तालुका समाज कल्याण खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. समाज कल्याण खात्याच्या संयुक्त संचालकांना निवेदन देण्यात आले. समाज कल्याण खात्याचे तालुका अधिकारी चिवटगोंडी यांच्याकडून दलित विरोधी भूमिका घेतली जात आहे. दलितांच्या सेवेसाठी असतानाही त्यांच्या हिताची कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी त्यांचे वर्तन चांगले नसल्याने त्यांना कामाविनाच परत जावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. गजपती येथे दलित कुटुंबीयांवर हल्ला झाल्याची घटना कळविण्यात आली असली तरी त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली नाही. घटना घडल्याच्या एक दिवसानंतर भेट देऊन चौकशी केली आहे. यातून त्यांचा बेजबाबदारपणा दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला. तारिहाळ येथील बाबू जगजीवनराम समुदाय भवनात गळती लागल्याची माहिती देऊनही गळती निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली नाही. तसेच मुचंडी व अष्टे ग्राम पंचायतीकडून मागासवर्गीय अनुदानात गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे. मात्र याबाबत अहवाल देण्यास अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे दलितांवर अन्याय होत असून तो दूर करावा, अशी मागणी केली. दलित विरोधी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून बदली करावी, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाकडून करण्यात आली.









