वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयसीसीतर्फे नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या वनडे क्रिकेटच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर भारताचा शुभमन गिलने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्चचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने दर्जेदार फलंदाजी करत 765 धावा जमवित स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. या कामगिरीमुळे कोहलीच्या मानांकनात एका अंकाने सुधारणा झाली. यापूर्वी तो चौथ्या स्थानावर होता. आता तो 791 मानांकन गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलने 826 मानांकन गुणासह पहिले, पाकचा कर्णधार बाबर आझम 824 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 769 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोहलीची फलंदाजी चांगलीच बहरली होती. त्याने या स्पर्धेत तीन शतके झळकवली असून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर अधिक शतके नोंदविली होती. पण कोहलीने सचिनचा हा विक्रम मागे टाकला. या स्पर्धेमध्ये कर्णधार रोहित शर्माने 597 धावा नोंदविल्या. दक्षिण आफ्रिकेचा डिकॉक याचे मानांकनातील स्थान दोन अंकांनी घसरले असून तो आता पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने 15 वे स्थान मिळविले आहे. वनडे क्रिकेट गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज अग्रस्थानावर असून भारताचे मोहम्मद सिराज आणि बुमराह हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कुलदीप यादव सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हॅझलवूडने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. वनडे क्रिकेट अष्टपैलूंच्या मानांकन यादीत बांगलादेशचा शकिब अल हसन अग्रस्थानावर असून न्यूझीलंडचा सँटेनर सातव्या तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज नवव्या स्थानावर आहे.









