अभिजीत खांडेकर
गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीची गदा पटकवलेल्या सिकंदर शेखची आज कोल्हापूरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल…मर्दानी खेळ आणि हलगीच्या ठेक्यावर सिकंदर शेख याला गजराजाने हार अर्पण केला. ऐतिहासिक बिंदू चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला असून माझी जन्मभूमी जरी सोलापूर असली तरी कर्मभूमी कोल्हापूर आहे असं सिकंदर शेख यांना म्हटलं आहे.
विश्वास हारूगले यांचा पठ्ठा आणि गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख याला गतवर्षी पुण्याच्या महेद्र गायकवाड याच्याकडून अंतिम सामन्यात हार पत्कारावी लागली होती. अत्यंत चुरशीचा आणि तितकाच वादग्रस्त झालेल्या या सामन्यातील पराजयामुळे कोल्हापूरकरांच्या पदरी निराशा पडली. पण य़ावर्षी कोल्हापूरकरांची निराशा आनंदात बदलून सिकंदर शेख याने गतवर्षाच्या शिवराज राक्षे याला चारीमुंड्या चित करून आपणच सिकंदर असल्याचे दाखवून दिले.
सिकंदर शेख्यच्या या विजयाने कोल्हापूरात विशेषत: गंगावेश तालमीत एकच जल्लोष करण्यात आला. तब्बल 39 वर्षांनी गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्याने गंगावेश तालमीचे माजी पैलवान संग्राम कांबळे आणि वस्ताद विश्वास हारूगले यांनी पैलवान सिकंदर शेख याची हत्तीवरून मिरवणूक काढली.
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख म्हणाला, “कोल्हापूरातून मला खुप प्रेम लाभले आहे. माझी जन्मभूमी जरी सोलापूर असली तरी कर्मभूमी कोल्हापूर आहे. आज मिरवणूकीत माझा मित्र परिवार आणि असंख्य कुस्ती शौकीन उपस्थित राहिल्याने मला आनंद झाला आहे.” अशा भावना व्यक्त केल्या.