बंधाऱ्याला ठिकठिकाणी गळती लागल्याने पाणी वाया : दुऊस्ती न झाल्यास 27 रोजी आंदोलनाचा इशारा
खानापूर : खानापूर तालुक्मयातील वड्डेबैल येथील मलप्रभा नदीवरील बंधाऱ्यातून गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने या भागातील 1 हजार हेक्टरवरील शेती धोक्यात आली आहे. लघुपाटबंधारे खात्याने येत्या चार दिवसात या बंधाऱ्याची दुऊस्ती करून वाहणारे पाणी अडवले नाही तर सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा चापगाव, वड्डेबैल, यडोगा, लक्केबैल येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत माहिती देताना चापगाव येथील ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश धबाले म्हणाले, वड्डेबैल येथील मलप्रभा नदीवर गेल्या काही वर्षांपूर्वी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र बंधारा बांधत असताना बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते. यावेळीही आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र कंत्राटदाराने आमच्या आक्षेपाची दखल न घेता बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. गेल्या दोन वर्षापासून बंधाऱ्याला गळती लागली असून पाणी अडवल्यानंतरही लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने शेतीसाठी फेब्रुवारी महिन्यानंतर या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही. याबाबत गेल्या महिन्यापूर्वी आम्ही लघुपाटबंधारे खात्याला लेखी निवेदन देऊन या बंधाऱ्याची दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
यावेळी लघुपाटबंधारे खात्याच्या अभियंत्या शितल बेंद्रे यांनी यावर आपण निश्चित उपाययोजना करू, असे आश्वासन दिले होते. यानंतर काही दिवसांपूर्वी थोडीशी डागडुजी करून या बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले आहे. मात्र बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात घळ निर्माण झाल्याने तिथून या बंधाऱ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. येत्या दीड महिन्यात हा बंधारा पूर्णपणे रिकामी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील 1 हजार हेक्टरवरील जमिनीवरील पीक धोक्यात येणार आहे. मुळातच यावषी पाऊस कमी झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी पिकांना तसेच जनावरांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहणार नसल्याने सर्वच पिके धोक्मयात येणार आहेत. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने येत्या चार दिवसात या गळतीची दुऊस्ती करावी आणि वाहून जाणारे पाणी अडवावे, अन्यथा सोमवार दि. 27 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश धबाले, परशराम यळगुकर, आनंद बेळगावकर, उदय पाटील, महादेव घारशी, नामदेव अंधारे यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









