साईराज चषक निमंत्रितांची फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनदिवशी साईराज एफसीने फॅन्कोचा, रेघ एफसीने स्वस्तीक एफसीचा तर मजर युनायटेडने, किंग्स युनायटेड संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. ठळकवाडी येथील सुभाषचंद्र लेले मैदानावर आयोजित केलेल्या 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरूस्कर्ते महेश फगरे, जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, देवराज जपजंपी, राजेश जाधव, चंदन कुंदरनाड, प्रणय शेट्टी, विठ्ठल गवस, प्रशांत वांडकर, जॅकी मर्स्कनस, अनिकेत नाईक, युवराज हुलजी, सारंग राघोचे, रमेश मलियागोड, दिपक मन्नोळी, अमर नाईक, विजय धामणेकर, विजय कुरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत महेश फगर, रोहित फगरे, गजानन फगरे यांनी केले. अमर सरदेसाई यांच्याहस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. महेश फगरे व देवदत्त जगजंपी यांच्याहस्ते चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साईराज स्पोर्टस क्लबचे सभासद विजय रेडेकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शांती व ऐकीचे प्रतिक म्हणून रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. साईराज व फॅन्को या संघादरम्यान सामन्यात सर्व मान्यवरांना संघाची ओळख करून देऊन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या सामन्यात साईराजने फॅन्कोचा 2-0 असा पराभव केला. सामन्यात 14 व्या मिनिटाला साईराजच्या प्रज्वल लाडने गोल करण्याची संधी वाया दवडली. 22 व्या मिनिटाला मंथन गावकरच्या पासवर मोहित उघाडेने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळविली.
दुसऱ्या सत्रात फॅन्कोच्या शाबादने गोल करण्याची नामी संधी दवडली. 52 व्या मिनिटाला अक्षय चव्हाणच्या पासवर मथंन गावकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात फॅन्को संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात मजर युनायटेडने स्वस्तीक संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला मजर युनायटेडचा उमर फारूकच्या पासवर मुस्ताकने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 28 व्या मिनिटाला मुस्ताकच्या पासवर उमर फारूकने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 48 व्या मिनिटाला मजर युनायटेडच्या आर्यनच्या पासवर उमर फारूकने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात स्वस्तीक संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात रेघ एफसीने किंग्स युनायटेड संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 23 व्या मिनिटाला रेघ एफसीच्या अभिनंदनच्या पासवर ओंमकारने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 43 व्या मिनिटाला ओंमकारच्या पासवर नवलने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
बुधवारचे सामने
1) खानापूर युनायटेड वि. जगजंपी बजाज स. 8 वाजता. 2) बुफा के. आर. शेट्टी वि. पहिल्या सामन्यातील विजेता. 3) तिसरा सामना ब्रदर्स वि. साईराज स. 11 वा. 4) फास्ट फॉरवर्ड वि. मजर युनायटेड दु. 12 वा. 5) पाचवा सामना आयबीसीटी वि. रेघ एफसी यांच्यात दु. 1 वा. होणार आहे.









