वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पाकचा संघ कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी पीसीबीने पाक संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी पाकचे माजी वेगवान गोलंदाज उमर गुल आणि सईद अजमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2009 साली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या पाक संघामध्ये उमर गुलचा समावेश होता. आता पाक संघाला उमर गुलचे गोलंदाजीचे मार्गदर्शन लाभणार आहे. दरम्यान सईद अजमलला प्रशिक्षकपदाची संधी पीसीबीने पहिल्यांदाच उपलब्ध करुन दिली आहे.
पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ही कसोटी मालिका 7 जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात खेळणार आहे. ही टी-20 मालिका 12 ते 21 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दौऱ्यासाठी पाक संघाच्या क्रिकेट संचालकपदी आणि प्रमुख प्रशिक्षकपदी मोहम्मद हाफिजची नियुक्ती केली आहे. पाकच्या निवड समिती प्रमुखपदी माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाजची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकच्या खराब कामगिरीनंतर निवड समिती प्रमुख इंझमाम उल हक्कने नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे विदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि ब्रेडबर्न यांचीही हकालपट्टी करण्यात आली. पाकचे गोलंदाज प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे मॉर्निंग मॉर्कल यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गोलंदाज प्रशिक्षक सईद अजमलने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 35 कसोटी, 113 वनडे आणि 64 टी-20 सामन्यात एकूण 447 गडी बाद केले आहेत.









