ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, जनजागृतीवर भर
कसबा बीड प्रतिनिधी
सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे ताप, डेंगीचा फैलाव वाढत आहे. घरोघरी तापाचे रुग्ण आढळत असून तापाबरोबरच प्लेटलेट कमी होणे आदी डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून तापाची साथ आटोक्यात आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. आतापर्यंत डेंगीसदृश आठ – दहा रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर पाच – सहा रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक अवस्थेतच उपचार केले जात असल्याने आजार लवकर आटोक्यात येत आहे.
गावात ताप, डेंगीसदृश रुग्ण आढळून येताच ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याची तपासणी करून घेतली आहे; पण त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही. शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली असता अनेकांच्या घरातील फ्रीज, पाण्याच्या साठवणुकीसाठीचे गंज, डेरे, टाक्या बॅरल, आदी ठिकाणी अळ्या आढळून आल्या.
घरोघरी तपासणी करताना आरोग्य विभागाकडून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक केले जात आहे. घरातील पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करून ड्राय डे पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीने रोजच्या रोज औषध फवारणीवर भर दिला आहे. उद्या सोमवारी घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप केले जाणार आहे. घरोघरी तपासणी, औषधोपचार, जनजागृती, औषध फवारणी, स्वच्छता ही मोहीम नियमित चालूच ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.