सर्पमित्र धनंजय कणबर्गी याच्याकडून जीवदान
किणये : मच्छे गावातील तरुण सर्पमित्र धनंजय कणबर्गी याने तीन दिवसांमध्ये दोन साप पकडून त्या सापांना जीवदान दिले आहे. ज्या ठिकाणी हे साप पकडले तेथील नागरिकांनाही सुरक्षा त्याने दिली आहे. धनंजय हा गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात साप पकडण्याचे काम करीत आहे. तीन दिवसांपूर्वी सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी येथील सुभाष पाटील यांच्या परसात नाग साप आला होता. सदर साप घरात येणार की काय अशी चिंता पाटील कुंटुबीयातील सदस्यांना लागून राहिली होती. यावेळी सर्पमित्र धनंजय याला बोलाविण्यात आले. त्याने त्या सापाला अगदी सुरक्षितरित्या पकडले. सदर साप विषारी नाग होता. त्याची लांबी सुमारे 5 फुटाहून अधिक होती, असे धनंजय याने सांगितले. रविवारी दुपारी एपीएमसी बॉक्साईट रोड येथील राजेंद्र अंकले यांच्या कंपाउंडमध्ये मोठा साप आला होता. हा साप पाहून सारेजण भयभीत झाले होते. सतीश पाटील यांनी धनंजय याला सदर ठिकाणी बोलावून घेतले. बरीच मेहनत घेऊन त्या सापाला धनंजय याने पकडले. हा साप घोणस जातीचा होता, असे त्याने सांगितले. या दोन्ही सापांना त्याने जांबोटी येथील डोंगरात सोडून दिले. धनंजय याचा पिरनवाडी येथील सतिश पाटील व इतर मान्यवरांनी सत्कार केला.









