जोल्ले दाम्पत्याच्या मौलिक मार्गदर्शनाचे फलित : प्रति दिवस 9000 मे. टन उसाचे गाळप : वीज निर्मितीदेखील पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
निपाणी : निपाणी तालुका हा शेतीप्रधान तालुका. येथील तंबाखू हे प्रमुख अन् पारंपरिक उत्पादन. अशा या तालुक्याचा शेती विकास साधण्यासाठी दिवंगत बाबुराव पाटील बुद्धिहाळकर यांच्या सहकार्याने हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना उभारला. पण कालांतराने कारखान्याचा वैयक्तिक मतलबासाठी वापर वाढीस लागला. याचाच परिणाम म्हणून कारखाना कुलूपबंद होण्याच्या स्थितीत पोहोचला. अशा या परिस्थितीत कारखाना वाचवणे आणि कामगार, ऊस उत्पादक सभासद यांचे हीत जोपासणे महत्त्वाचे होते. यावेळी खासदार आण्णासाहेब जोले व आमदार शशिकला जोल्ले यांनी कारखान्याला संजीवनी देण्याचा विडा उचलला. अवघ्या 5, 6 वर्षात कारखान्याने उर्जितावस्थेकडे वाटचाल करताना सध्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून यशस्वी घोडदौड चालवली आहे.
खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांचे मतदारसंघाला लाभलेले नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे. शाश्वत विकासाला गती देताना या दाम्पत्याने नेहमीच शेती, औद्योगिक, सहकार, शिक्षण आणि रोजगार निर्मिती याला पाठबळ दिले आहे. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना देखील याचाच एक भाग आहे. कारखाना टिकला तरच कामगारांचा रोजगार आणि कामगारांचे कुटुंब टिकणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देणारा हक्काचा कारखाना देखील टिकणार आहे. हे लक्षात घेऊनच जोल्ले दाम्पत्याने हालसिद्धनाथ साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले. बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून कारखान्याला नवनिर्मितीची आर्थिक संजीवनीच दिली.
वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू
कारखान्याचे विस्तारीकरण करताना साडेतीन हजाराचे क्रेशिंग पाच हजार करण्याचा निर्णय झाला. इजाक कंपनीच्या माध्यमातून त्यात यश देखील मिळवले गेले. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली पण होणारा ऊस पुरवठा आणि असणारी गाळप क्षमता याचा ताळमेळ न लागता ऊस शिल्लक पडू लागला. हे लक्षात घेऊन विस्तारीकरणादरम्यान बंद ठेवण्यात आलेल्या जुन्या मिलला देखील संजीवनी देण्यात आली. भंगारात विकून काढण्याची कार्यवाही सुरू असताना जुनी मिल अल्पशा खर्चात पूर्ण झाली. अडीच हजार टन प्रति दिवस गाळप करण्याची क्षमता या मिलच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या
कारखान्याचे कर्मचारी हे कारखान्याच्या प्रगतीचे प्रमुख माध्यम आहेत. हे लक्षात घेऊन जोल्ले दाम्पत्याने प्रथम कर्मचाऱ्यांना कायम करून घेताना वेतन वाढही देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मतदारसंघातील शेकडो युवकांच्या हाताला काम देताना रोजगार मिळवून दिला. हजारो हात कारखान्याशी जोडले गेल्याने कारखान्याची शक्ती वाढत गेली. परिसरातील ऊस उत्पादन वाढत जाताना कारखान्याला होणारा उसाचा पुरवठा देखील वाढत राहिला. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करावा, यासाठी महत्त्वपूर्ण व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या. यामध्ये रासायनिक औषधे-खते पुरवठा, सभासदांना विमा संरक्षण अशा योजना राबविल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी कारखान्याच्यावतीने बांधावर जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे उपक्रम सुरू केले.









