शिक्षिका-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून कारभार स्वच्छ ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गावातील अंगणवाड्यांच्या गैरकारभाराची जोरदार चर्चा गावात सुरू असून अंगणवाडी शिक्षिका व तेथील कर्मचाऱ्यांची बदली करून प्रत्येक गावातील अंगणवाड्यांचा कारभार स्वच्छ ठेवावा आणि गावच्या मुलांना शासनाच्या नियमाप्रमाणे सोयी-सुविधांचा वेळेत पाठपुरावा करावा, अशी मागणी कुद्रेमनी येथील नागरिक एकनाथ महादेव कांबळे यांनी केली आहे.
गावातील अंगणवाडी केंद्रात बालकांना निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते. अंडी देण्यात येत नाहीत. सुपरवाईझर लक्ष देत नाहीत. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षिकांची बदली करावी, अशी त्यांनी तक्रार केली आहे.
4 नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव महिला बालकल्याण विभागाकडे एकनाथ कांबळे यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी कुद्रेमनी येथील अंगणवाडी क्र. 103 या ठिकाणी एक महिन्यापासून मुलांना अंडी देण्यात आलेली नाहीत. एका आठवड्यात दोन वेळा अंडी देण्याचा नियम आहे. ती वेळेत दिली जात नाहीत. मुलांना भात-आमटी व्यवस्थित दिली जात नाही. अंगणवाड्या वेळेत उघडल्या जात नाहीत. वेळेत येत नाहीत. वेळे अगोदरच अंगणवाडी बंद होते. असे का म्हणून विचारले तर उलट उत्तरे मिळतात. अशा आशयाचे निवेदन दिलेले असून त्यांच्या बदल्या करा, नसेल तर सेवेतून कमी करा, अशी मागणी एकनाथ कांबळे यांनी केली आहे.









