कांगारुंना हलक्यात घेणार नाही : रोहित शर्माचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
. तब्बल 12 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ रविवारी आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियाला हरवत टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अंतिम सामन्याच्याआधी शनिवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने नाणेफेक, प्लेईंग इलेवन, खेळपट्टी यावर भाष्य केले.
मी जेव्हापासून कर्णधार झालो तेव्हापासून आम्ही या दिवसाची तयारी करत आहोत. आम्हाला तिन्ही फॉरमॅटमध्ये योग्य खेळाडूंची निवड करायची होती. गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही हे करत आहोत. आम्ही सर्वांची भूमिका स्पष्ट केली आहे. याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आशा आहे की आम्ही अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करू. अर्थातच, 20 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना होत असल्याने याबद्दल निश्चितच उत्सुकता आहे. यामुळे आज होणाऱ्या अंतिम सामन्यात जेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच उतरणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
राहुल भाईंचे योगदान मोठे
यावेळी बोलताना रोहितने संघाच्या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. संघाच्या यशात राहुल भाईंचे योगदान सर्वात मोठे असल्याचे रोहितने सांगितले. आम्ही मागील वर्षी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचलो होतो आणि पराभूत झालो होतो. त्यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या भूमिकेविषयी सांगितले होते. त्यांनीही त्यांच्या काळात संघासाठी खूप काही केले आहे. तेही या ट्रॉफीचे हक्कदार आहेत. आता आम्हीही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही वेळ आहे, असेही रोहित यावेळी म्हणाला.
हा सर्वात मोठा क्षण
आतापर्यंत जे काही झालं आहे ते स्वप्नवत आहे. आव्हानांचा सामना करत लक्ष्य केंद्रीत करणं हे एका खेळाडूला सर्वाधिक आव्हानात्मक असतं. हा आमच्या करिअरमधील मोठा क्षण आहे. तुम्ही रोज वर्ल्डकप फायनल खेळत नाही. मी एकदिवसीय विश्वचषक पाहत मोठा झालो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वात मोठी संधी असेल, असेही तो याप्रसंगी म्हणाला.
नाणेफेक हा विषय फार मोठा नाही
खेळपट्टीवर काही गवत आहे. यामुळे उद्या खेळपट्टी बघून पुढील दिशा ठरवू. तसेच तापमानातही किंचित घट झाली आहे. दव खेळाला कशी मदत करेल हे मला माहीत नाही. नाणेफेक फार मोठी भूमिका बजावेल असे मला वाटत नाही.
भारतीय क्रिकेटर म्हणून नक्कीच दबाव असणार आहे. खेळाडू म्हटले की, कौतुक टीका अन् दबाव या गोष्टी येतातच. 20 वर्षापूर्वी काय झाले याचा आम्ही जराही विचार करत नाही, याउलट उद्या जेतेपद मिळवण्यासाठी आमचे 100 टक्के योगदान राहिल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचे तो यावेळी म्हणाला.









