डॉ. सोनाली सरनोबत : अन्नपूर्णा महिला को-ऑप. सोसायटीचा रौप्यमहोत्सव उत्साहात
बेळगाव : महिलांकडून शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले जात असले तरी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे महिलांच्या जीवनात तणाव निर्माण होऊ लागला आहे. त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. एकमेकांबरोबर पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, असा सल्ला डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिला. अन्नपूर्णा महिला को-ऑप. सोसायटीचा रौप्यमहोत्सव शुक्रवारी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल इंग्रजी शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सहकारी संस्थांचे प्रथम दर्जा असिस्टंट को-ऑपरेटिव्ह अधिकारी चंद्रकांत गुरव होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप वाली, संस्थापिका सुनिता अष्टेकर व संचालिका उपस्थित होत्या. हणमंत शास्त्री गुरुजी यांनी शांतीपठण सादर केले. संचालक मंडळाने इशस्तवन व स्वागतगीत सादर केले. परिचय भारती बर्गे यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांचा शाल आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
आजच्या स्त्रीला स्वत:ची ओळख होणे गरजेचे
डॉ. सरनोबत पुढे म्हणाल्या, आजच्या स्त्रीला स्वत:ची ओळख होणे गरजेचे आहे. शिवाय स्वत:च्या मनाची पाठराखण देखील करता आली पाहिजे. काहींना शारीरिक, वैवाहिक आणि इतर समस्या असतात. मात्र अशा परिस्थितीत संयम आणि शांती राखून योग्यवेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. टीव्हीवरील वाईट गोष्टींचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुले, संवादाविना राहू लागली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परंपरा जपणारी देशभक्ती गीते, गोंधळ, मंगळागौर अन् जोगवा कार्यक्रम
यावेळी चंद्रकांत गुरव आणि प्रदीप वाली यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारी देशभक्ती गीते, गोंधळ, मंगळागौर आणि जोगवा कार्यक्रम झाला. यावेळी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहभागी झालेल्या कलाकारांनी हे राष्ट्र देवतांचे, लल्लाटी भंडार, पिंगा ग पोरी पिंगा आदी गाण्यांवर नृत्य सादर केले. याप्रसंगी लक्ष्मी हिरोजी, विनोदिनी आनंदाचे, स्वाती लाटूकर, श्रद्धा अष्टेकर यांसह संचालिका, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सुधा होसमनी यांनी आभार मानले.









