केएलई कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती
बेळगाव : आरोग्य क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधने झाली पाहिजेत. या संशोधनांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केएलई संस्था सज्ज आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. केएलई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन केंद्रासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केएलई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. नितीन गंगाणे, डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. एस. एस. गौडर, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. एन. एस. महांतशेट्टी, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 13 एप्रिल 2006 रोजी काहेरची स्थापना झाली आहे. तेव्हापासून पदवीपूर्व, स्नातकोत्तर, दंतवैद्यकीय, फार्मासी, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग, अलाईड हेल्थ सायन्स कोर्स चालविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात काहेरने आपला ठसा उमटविला आहे, असेही डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
दहा वैद्यकीय महाविद्यालयात जेएनएमसीचाही समावेश
अवयव रोपण शस्त्रक्रियेसह विविध सुविधांनी युक्त 2500 खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा असणारे सुसज्ज इस्पितळ कार्यरत आहे. देशातील अत्यंत स्वच्छ विद्यापीठाच्या यादीत भारत सरकारने सतत चौथ्या व तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ विद्यापीठ म्हणून काहेरचा गौरव केला आहे. वैद्यकीय प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय वैद्यकीय मंडळाने नोडल केंद्र म्हणून निवडलेल्या दहा वैद्यकीय महाविद्यालयात जेएनएमसीचाही समावेश आहे. आरोग्य रक्षण व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये स्टार्टअपना पाठिंबा देण्यासाठी काहेरने पाऊल उचलले आहे. वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण यांच्यात सुधारणा घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पन्न व सेवा विकसित करण्यासाठी पुढे येणाऱ्यांना काहेरकडून मदतीचा हात मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संधी दिली जाणार आहे. खासकरून बेळगावच्या आर्थिकतेच्या विकासासाठी मदतीचे ठरेल, अशा स्टार्टअपना आर्थिक मदत केली जाणार आहे. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, फार्मासी, आयुर्वेदात काहेरकडे अनेक पेटंट आहेत. त्यामुळे नव्या कंपन्या सुरू करून उत्पादकता वाढविण्याचे सामर्थ्य संस्थेत आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या वैद्यकीय उपकरणे व इतर उत्पादने परदेशातून आयात केली जात आहेत. मेक इन इंडिया संकल्पनेतून विशेष वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीतही बदल घडविण्यात येणार आहे.









