बहुतांश शिवारातील भातपिके खराब : कामे जोमाने सुरू : पिके सुकल्याने उत्पादनात होणार घट
वार्ताहर /किणये
तालुक्यात भात कापणीची धांदल जोमाने सुरू झाली आहे. दिवाळी सणानंतर सर्रास भात कापणीच्या कामाला शेतकऱ्यांची लगबग चालू झालेली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिली. यामुळे बहुतांशी शिवारातील भातपिके खराब झाली आहे. तरीही काही शिवारांमध्ये शिल्लक राहिलेली भात पिकांची कापणी सुरू आहे. पावसाअभावी भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. भात बहरुन येण्याच्या व पोसविण्याच्या ऐन कालावधीत पाऊस नव्हता. त्यामुळे भात पिकांची वाढ खुंटली. तसेच बऱ्याच शिवारातून भातपीक सुकून गेलेले आहे. यामुळे यंदा साहजिकच भाताच्या उताऱ्यात घट होणार आहे. पाणथळ तसेच विहिरी व कूपनलिकेचे पाणी देऊन काही ठिकाणी भात पोसवून आले. या शिवारांमध्ये भाताची कापणी दिवाळीपासून सुरू करण्यात आली आहे. तर दिवाळी सण झाल्यानंतर गुरुवारपासून कापणीच्या कामाला जोर आल्याचे पहावयास मिळत आहे. बासमती, इंद्रायणी, शुभांगी, सोनम, सोना मसुरी, माधुरी, इंटान, दोडगा आदी प्रकारची भातपिके घेण्यात आली आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे भात पोसवले नाही. यामुळे यंदा शेतकऱ्यांनाही तांदूळ विकत आणूनच खावा लागणार आहे.
मजुरांचा तुटवडा
नावगे व मच्छे परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. कारखाने गावाच्या वेशीपर्यंत आले. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. ही जमेची बाब आहे. मात्र शेत शिवारात काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा अधिक प्रमाणात निर्माण झाला आहे. भात कापणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. एका माणसाला भात कापणीसाठी दिवसाला 200 ते 220 रुपये या प्रमाणात मजुरी देण्यात येत आहे.
– कृष्णा पाटील, नावगे









