वृत्तसंस्था/ कुवैत सिटी
मनवीर सिंगने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर भारताने 2026 फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात यजमान कुवैतचा 1-0 असा पराभव केला.
मनवीर सिंगने 75 व्या मिनिटाला लालियानझुआला छांगटेकडून मिळालेल्या क्रॉस पासवर डाव्या पायाने फटका मारत पहिला गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. कुवैतने अखेरपर्यंत बरोबरीसाठी प्रयत्न केले. पण त्यांना रोखण्यात भारताने यश मिळविले. अखेरच्या टप्प्यात तर त्यांना दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटाला फैजल अलहर्बीने छांगटेला चुकीच्या पद्धतीने लाथाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे फैजलला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. भारताचा पुढील सामना आशियाई चॅम्पियन्स कतारविरुद्ध 21 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये होणार आहे.
भारताचा अ गटात समावेश असून याच गटात कतार, कुवेत व अफगाणिस्तान यांचाही समावेश आहे. गटात पहिले दोन स्थान पटकावणारे संघ तिसऱ्या फेरीच्या पात्रता स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरणार आहेत. याशिवाय प्रत्येक गटातील अव्वल दोन स्थान मिळविणारे संघ 2027 एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय आजवर एकदाही तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. गेल्या जुलैमध्ये सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने कुवैतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून जेतेपद पटकावले होते.









