नव्या सामर्थ्यवान यंत्राच्या साहाय्याने खोदकाम
वृत्तसंस्था / उत्तरकाशी
येथे एका बोगद्याच्या निर्मितीकार्यावेळी दरड कोसळल्याने बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवरून प्रयत्न केला जात आहे. नव्या सामर्थ्यवान यंत्राच्या साहाय्याने खोदकाम करुन त्यांना बोगद्यातून बाहेर काढण्याची योजना आहे. शुक्रवारी एका दिवसात बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 22 मीटरची चर खोदून कामगारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
सर्व कामगार सुस्थितीत असून त्यांच्याशी बाहेरुन संपर्क केला जात आहे. तसेच त्यांना अन्नपाण्याची पाकिटेही पोहचविली जात आहेत. मात्र, अद्याप त्यांना बाहेर काढण्याइतकी मोठी चर खोदली गेलेली नाही. हे काम येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल, असे साहाय्यता व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
एक मीटर रुंदीचा चर आवश्यक
कामगारांची सुटका करण्यासाठी एक मीटर रुंदीचा चर खोदणे आवश्यक आहे. सध्या 9 सेंटीमीटर रुंदीचे पाईप उपयोगात आणून चर खोदण्याचा प्रयत्न होत आहे. अडकलेल्या कामगारांना कोणताही धक्का लागू नये अशा प्रकारे हे चर खोदण्याचे काम करावे लागते. तसेच खोदकामामुळे आणखी दरडी कोसळू नयेत याचीही दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे खोदकाम सावकाशपणे करावे लागते. म्हणून त्यासाठी विलंब लागत आहे, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
यंत्र बदलल्यानंतर वेग
प्रारंभी खोदकामाचा वेग कमी होता. मात्र, नंतर अमेरिकन बनावटीचे अधिक शक्तिशाली यंत्र उपलब्ध झाल्याने वेग मोठ्या प्रमाणात वाढला. आता पुढील 48 ते 72 तासांमध्ये खोदकाम पूर्ण होऊन कामगारांची सुटका होण्याची मोठी शक्यता आहे. सुटका कार्यात अनेक आपत्ती साहाय्यता संस्था सहभागी झाल्या आहेत. आणखी साधारणत: 20 मीटर खोदकामाची आवश्यकता आहे.









