पहाटे-रात्री थंडी, उबदार कपड्यांची मागणी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढू लागली आहे. शहराचा पारा घसरू लागल्याने वाढत्या थंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तर विविध आजारदेखील बळावू लागले आहेत. त्याबरोबर थंडीसाठी उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणही तयार होऊ लागले आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडाही अनुभवावयास मिळत आहे. मागील आठवड्यात थंडीची तीव्रता कमी झाली होती. पुन्हा थंडी वाढू लागली आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकीट, कानटोप्या, हातमोजे, मफलर आदींना पसंती दिली जात आहे. वाढत्या थंडीने आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढू लागल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात पहाटे थंडीबरोबर धुकेदेखील पडू लागले आहे. त्यामुळे पहाटे धुक्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. नोव्हेंबर प्रारंभीला थंडी जाणवत होती. मात्र मध्यंतरी काहीशी थंडी ओसरली होती. मात्र आता पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळी आणि रात्रीच्यावेळी थंडीचा कडाका जास्त असल्याने पहाटे आणि रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही दगा दिला आहे. कधी ऊन, कधी थंडी तर कधी धुके अशा संमिश्र वातावरणाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.