वृत्तसंस्था /मुंबई
विराट कोहलीने बुधवारी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याचा विक्रम केल्यानंतर त्याच्यावर संपूर्ण क्रिकेट जगतातून अभिनदंनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. ‘मॅस्ट्रो सचिन तेंडुलकरने एक उच्च दर्जाचा स्तर निश्चित केलेला असेल, तर ‘सुपर ह्युमन’ विराट कोहलीने येऊन तो 50 व्या एकदिवसीय शतकासह आणखी थोडासा वाढवला आहे’, असे लिटल मास्टर सुनील गावस्करने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. ‘फक्त विराटसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर भारतीय क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी याचा अर्थ काय आहे ते शब्दांत मांडणे फार कठीण आहे, असे गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर आपले मत व्यक्त करताना म्हणाले. कारण तुमच्याकडे नेहमीच असे लोक असतात जे मानक स्तर निश्चित करतात. मग तुम्हाला कोणी तरी यावे आणि तो स्तर आणखी थोडा वाढवावा असे वाटत असते. विराट कोहलीने त्याच्या कामगिरीने तेच केले आहे. या विश्वचषकात तो पूर्णपणे सुपर ह्युमन राहिलेला आहे. त्याने या स्पर्धेत जवळपास 700 धावा काढलेल्या असून दोन शतके तसेच इतर सहा डावांमध्ये अर्धशतके नोंदविलेली आहेत,’ असे गावस्कर पुढे म्हणाले. भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजेतेपदात मोलाचा वाटा उचललेल्या युवराज सिंगने विराटला या पिढीतील सर्वांत महान फलंदाज असे संबोधले आहे. ‘मला खात्री आहे की, त्याच्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असेल आणि ते वरून आकाशामधून आपल्या मुलाकडे पाहून आनंदाने स्मित करत असतील.
या पिढीतील सर्वांत महान खेळाडू, असे युवराजने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणने कोहली आता स्वत:च्या वेगळ्या गटात पोहोचला असल्याचे म्हटले अहे. विराट कोहली ‘सर्वकालीन महान खेळाडू’ असे आकाश चोप्राने नमूद केले असून भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने कोहलीचे वर्णन ‘भारतीय क्रिकेट नियंत्रण कक्ष’ असे केले आहे. 50 वे एकदिवसीय शतक ही फक्त एक संख्या नाही, तर क्रिकेटमधील महानतेची ती एक विलक्षण कथा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने दिली आहे. शिखर धवन, भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना यांनीही विराटचे अभिनंदन केलेले आहे. पाकिस्तानचा महान गोलंदाज वासिम अक्रमने ‘कोहली युग’ असे संबोधले आहे. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसननेही कोहलीच्या पराक्रमाची स्तुती केली आहे. ‘त्याच्याविषयी संशय घेतला गेल्यावर तो गप्प बसला आणि त्याच्या बॅटला बोलू दिले. आज तू जे केलेस ते खूप आवडले मित्रा’, असे पीटरसनने त्याच्या ‘एक्स’ हँडलवर लिहिले आहे. याशिवाय विराटचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज-समालोचक इयान बिशप, अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान यांचाही समावेश आहे.
जोकोविचकडूनही अभिनंदन
दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही कोहलीला अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. ‘अभिनंदन विराट, लिजंडरी’, असे जोकोविचने त्याच्या ‘इंस्टाग्राम पोस्ट’मध्ये म्हटले आहे. विराटने प्रथम शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी तीन डाव घेतले आणि नंतर तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांना मागे टाकले. तसेच या विश्वचषकात 700 धावा जमविणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.









