वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचा पुरुषांच्या ‘वर्ल्ड अॅथलीट ऑफ दि इयर’ पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा 25 वर्षीय भारतीय खेळाडू वरील प्रतिष्ठित सन्मानासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंपैकी एक आहे.
चार देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदर पाच खेळाडूंनी यंदा अॅथलेटिक्सच्या विविध शाखांमध्ये सनसनाटी कामगिरी केली असून जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसह विविध स्पर्धांत जेतेपदे पटकावली आहेत आणि जागतिक विक्रम मोडले अहेत, असे ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’ने म्हटले आहे. अंतिम यादीतील इतर पुऊष खेळाडूंमध्ये अमेरिकेचा रायन क्राऊजर (गोळाफेक), स्वीडनचा मोंडो डुप्लांटिस (पोल व्हॉल्ट), केनियाचा केल्विन किप्टम (मॅरेथॉन) आणि अमेरिकेचा नोहा लायल्स (100 मीटर्स/200 मीटर्स) यांचा समावेश आहे. 11 डिसेंबर रोजी या पुरस्काराच्या मानकऱ्याची घोषणा केली जाईल.









