बेळगावमधून लिंगायत, चिकोडीमधून धनगर उमेदवार देण्यासाठी चिंतन
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी लिंगायत तर चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी धनगर समाजातील उमेदवार देण्यासाठी चिंतन सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी यापूर्वीपासूनच सुरू आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. उमेदवार निवडीसाठी तीन टप्प्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हायकमांडच्या मार्गदर्शनानुसारच उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही मंत्र्याला लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी हायकमांडकडून सूचना करण्यात आली नाही. उमेदवार निवडीसाठी प्रथम अर्ज मागविले जातात. निवडणुकीला इच्छुक असणारे अर्ज करतात. यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी केली जात नाही. राहुल जारकीहोळी अथवा मृणाल हेब्बाळकर लोकसभा निवडणूक लढविणार असे आपण बोललो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुमारस्वामींकडून आरोप
एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडून अनेक आरोप केले जात आहेत. ते विरोधी पक्षात असल्यामुळे आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना बोलू नका, असे आपण सांगू शकणार नाही. केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकारीच स्पष्टीकरण देतील, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा प्रचार करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविल्या पाहिजेत. जाती गणतीबाबत बोलताना ते म्हणाले, जाती गणती अहवालाबद्दल आपल्याला स्पष्ट काही माहिती नाही. त्यामध्ये काय आहे, काय नाही, यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.









