वार्ताहर /कोगनोळी
कार आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये चौघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील अंधारलक्ष्मीजवळ घडला. याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, बारामती येथील दुचाकीवरुन दोघेजण आप्पाचीवाडी व आदमापूर येथे देवदर्शनासाठी जात होते. याच दिशेने सांगोला येथील कारमधून चौघेजण देवदर्शनासाठी जात होते. येथील अंधारलक्ष्मीजवळ आल्यावर त्यांच्यामध्ये अपघात झाला. त्यावेळी दुचाकीवरील दोघेही रस्ता सोडून बाजूला पडले होते. तर कार रस्त्यावरुन ब्रयाच अंतरावर पलटी झाली.
यामध्ये दुचाकीवरील तानाजी कोळी (वय -40, रा. बीड), आणि दत्तात्रय ठोंबरे (वय-40, रा. बीड) तर कारमधील सविता लिगडे (वय-47, रा. सांगोला), आणि लता लिगडे (वय-45, रा. सांगोला) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातातील जखमींना तातडीने महामार्ग प्राधिकरणाच्या अम्बुलन्समधून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस.आय.कंबार व त्यांच्या सहक्रायांनी भेट दिली.









